भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात तब्बल 25 वर्षांनी काँग्रेसचा खासदार

 

गोंदिया- भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातून तब्बल २५ वर्षांनी काँग्रेसने आपल्या चिन्हावर निवडणूक लढवत भाजपच्या हातून खासदारकी आपल्याकडे खेचून आणली. काँग्रेसच्या डॉ. प्रशांत पडोळे यांनी ५ लाख ६६ हजार ३८१ मत घेऊन भाजपच्या सुनील मेंढे यांचा तब्बल 34 हजार 157 मतांनी पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे हेविवेट नेते प्रफुल पटेल यांचा मतदार संघातच हा पराभव महायुतीच्या जिव्हारी लागला, हे मात्र निश्चित.भाजपच्या मेंढेना 5 लाख 32 हजार 224 मते मिळाली.बसपचे संजय केवट 24 हजार 042 व वंचित आघाडीचे संजय केवट यांना 23 हजार 847,माजी आमदार सेवक वाघाये यांना १२७५० मते मिळाली.

 

महाराष्ट्रात मागील दोन वर्षांत अनेक नाट्यमय घडामोडी घडून शत्रू पक्ष मित्र झाले तर मित्रपक्ष शत्रू झाल्याचे पहावयास मिळाले. त्यातच शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटिमुळे वातावरण अधिकच गढूळ झाले होते.

भंडारा – गोंदिया लोकसभा मतदार संघ हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून परंपरागतरित्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यात येत असल्याने या मतदार संघातून प्रफुल्ल पटेल निवडणूक लढवत होते. यावेळी मात्र प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात आल्याने व भाजप सोबत युतीत असल्याने या राष्ट्रवादी काँग्रेसच्या परंपरागत मतदार संघातून भाजपने सुनील मेंढे यांना उमेदवारी दिली होती.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट भाजपला मिळाल्याने काँग्रेसने तब्बल 25 वर्षांनी पंजा या चिन्हावर निवडणूक लढविली. भंडारा – गोंदिया लोकसभा मतदार संघ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी अतिशय प्रतिष्ठेचे बनले होते. त्यामुळे या मतदार संघाकडे अख्या राज्याचे लक्ष लागले होते. विशेष म्हणजे सदर मतदार संघ हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना भाऊ पटोले यांचा गृहजिल्हा असल्याने त्यात अधिकच रंगत आली होती. भाजपने यावेळी मतदार संघात खूप जोर लावून निवडणुकीत विजयासाठी जोरकस प्रयत्न केले. काँग्रेसच्या वतीने नाना भाऊ पटोले यांनी संपूर्ण धुरा हातात घेऊन आपली जादू या मतदार संघावर कायम असल्याचे दाखवून दिले.

भाजपचे गणित हे भाजपचे परंपरागत मतदार तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मतदारांवर अवलंबून होते. त्यामुळे विजयाचे गणित हे साहजिकच लाखाच्या वर जाणार असे भाजप कार्यकर्त्यांना वाटत होते. मात्र सुनील मेंढे यांना भाजपच्या अंतर्गत गटबाजी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मतदारांनी दाखविलेली पाठ यांचा फटका बसल्याचे बोलले जात आहे. त्याचप्रमाणे सुनील मेंढे यांना पक्षांतर्गत विरोध असतानाही त्यानांच उमेदवारी देणे भाजपला अती आत्मविश्वास नडला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

त्या तुलनेत मात्र 25 वर्षांनी पंजा हे चिन्ह या मतदार संघात आल्याने तसेच दलीत, मुस्लिम तसेच बहुजन मतदारांची साथ मिळाल्याने काँग्रेसने मात्र विजयी पताका फडकाविली.

एकंदरीत वरच्या पातळीवर मोठ्या नेत्यांना आपल्या गळ्याला लावले की कार्यकर्ते आपल्या पाठीशी येतात, हा भ्रम मात्र या निवडणुकीत गळून पडल्याचे निवडणूक निकालावरून दिसुन येते.

news portal development company in india

Read More Articles