अर्जुनी मोरगाव– अतालुक्यातील नागरिकांना भेडसावणाऱ्या तीव्र पाणीटंचाईवर तोडगा काढण्यासाठी स्थानिक आमदार राजकुमार बडोले यांनी पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांना निवेदन दिले आहे.
निवेदनानुसार, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील रामपुरी, अर्जुनी मोरगाव, खांबी व सिरेगाव या चार प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांद्वारे ६५ गावांना स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा केला जात आहेत. मात्र, सन २०१९-२० नंतर शासकीय अनुदान थांबविण्यात आल्याने या योजना अडचणीत आल्या असून, परिणामी एप्रिल २०२5 पासून या योजना पूर्णतः बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पाणीपुरवठा बंद झाल्यास तालुक्यातील नागरिकांवर तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता असून, याचा विपरीत परिणाम आरोग्यावर देखील होईल. याच पार्श्वभूमीवर, आमदार बडोले यांनी संबंधित योजनांसाठी तातडीने शासकीय अनुदान सुरू करण्याची मागणी केली आहे. तसेच, पूर्वीप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या पेयजल योजनेअंतर्गत १००% प्रोत्साहन अनुदान सुरू करण्यासाठी देखील सरकारने सकारात्मक पाऊल उचलावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.
तालुक्यातील नागरिकांनी देखील या मागणीस पाठिंबा दर्शवला असून, लवकरात लवकर या योजनांना आर्थिक मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.माननीय मंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रावरून केलेल्या आदेशानुसार पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग प्रधान सचिव त्याचप्रमाणे सदस्य सचिव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे