Gondia : चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या 10 वर्षीय चिमुकलीवर 22 वर्षांच्या नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यात घडली आहे. या प्रकरणातील आरोपीला केशोरी पोलिसांनी अटक केली आहे. कमलेश मडावी (22) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे गोंदिया जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
आरोपी आणि पीडिता चिमुकली ही एकाच गावातील रहिवासी असून शाळेला सुट्टी झाल्यानंतर चिमुकली ही घराच्या अंगणात खेळत होती. यावेळी आरोपी तिच्या घरी गेला व पिण्यासाठी पाणी मागितले व त्यानंतर चिमुकलीवर अत्याचार केले. ही बाब शेजाऱ्यांना लक्षात येताच शेजाऱ्यांनी पिडीतेच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलीस स्टेशन गाठत या घटनेची माहिती पोलिसांना दिली. याप्रकरणी पोलिसांनी कलम 65/2, पॉस्को 4/6/8 व 332 अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली केशोरीचे पोलीस निरीक्षक गणेश वनारे करीत आहेत.