यंदा शिक्षकांची उन्हाळ्याची सुट्टी रद्द, विद्यार्थ्यांनाही यातून ‘सुट्टी’ नाही

गोंदिया,दि.२५ मार्चः जिल्हा परिषदेच्या शाळांच्या शिक्षकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. या शिक्षकांना यावर्षी उन्हाळी सुट्टीतही विद्यार्थ्यांचा अभ्यास घ्यावा लागणार आहे. तसेच दर आठवड्यातील विद्यार्थ्यांचे प्रगतीचे मूल्यांकन करून ३० जूनपूर्वी प्रत्येक विद्यार्थी भाषा आणि संख्याशात्र ज्ञानात परिपूर्ण करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. म्हणजेच यंदा त्यांना उन्हाळ्याची सुट्टी उपभोगता येणार नाही.

शालेय शिक्षण विभागाच्या वतीने यंदा राज्यातील दुसरी ते पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी करण निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम राबविण्याचे निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे यंदा सुट्टीतही शिक्षकांना विद्याथ्यांचे ऑनलाईन अथवा ऑफलाईन अध्यापन करावे लागणार आहे.

या उपक्रमातील राज्यातील दुसरी ते पाचवीच्या प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांची किमान ७५ टक्के भाषा आणि अध्ययन क्षमता परिपूर्ण करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. यासाठी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व अनुदानित, खाजगी प्राथमिक, अनुदानित अंशतः अनुदानित या शाळांमध्ये हा उपक्रम सक्तीचा करण्यात आला असून सहावी ते आठवीच्या वर्गासाठी ऐच्छिक ठेवण्यात आलेला आहे.

हा उपक्रम राज्यातील सर्व जिल्ह्यात ५ मार्च ते ३० जून या चार महिन्यांच्या कालावधीत राबवण्यात येणार असून यासाठी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना ठरवून दिलेल्या कौशल्यांमध्ये अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त असल्याची पडताळणी करण्यात येणार आहे. यामुळे यंदा उन्हाळ्यातही शिक्षकांना विद्यार्थ्यांना अध्यापनाचे धडे द्यावे लागणार असून अभ्यासाला सुट्टी मिळणार नाही. हा उपक्रम राबवण्यासाठी शिक्षकांना सुट्टीच्या कालावधीत ऑफलाईन अथवा ऑनलाईन अध्यापन करावे लागणार आहे.

निपुण भारत उपक्रमात प्रगत होणाऱ्या विद्यार्थ्यांची क्षमता व प्रगती तपासण्यासाठी चावडी वाचन व गणन कार्यक्रम करण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभाग पातळीवरून देण्यात आलेले आहेत. हा कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शनिवारी अचानक जिल्हाभरातील सर्व शाळांना भेटी देत, या उपक्रमाच्या तयारीची माहिती तपासली. तसेच पुढील काळात सातात्यानेही तपासणी जिल्हा परिषद पातळीवरून करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. सूत्रांकडून

निपुण भारत उपक्रमात शालेय शिक्षण विभागाच्या वतीने दिलेल्या विहित कालावधीत अपेक्षित अध्ययन स्तर गाठणाऱ्या शाळा व शिक्षकांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच ज्या शाळा अपेक्षित उद्दिष्ट साध्य करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाईचा बडगा उभारण्यात येणार आहे. उपक्रमात संबंधित शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीलाही सहभागी करून घेण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आलेले आहेत.

news portal development company in india

Read More Articles