नवी दिल्ली : देशभरात 2024च्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. या निवडणुकीसाठी सात टप्प्यांत मतदान होत आहे. देशाच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया चार महिने चालली होती. देशात पहिल्या लोकसभा निवडणुकीचं नियोजन कसं होतं, ते सविस्तर जाणून घेऊ या. `भारत एक्सप्रेस`ने याविषयीचं वृत्त दिलं आहे.
निवडणूक आयोगानं नुकतीच 2024च्या लोकसभा निवडणुकीची घोषणा केली. या वेळी लोकसभेसाठी सात टप्प्यांत मतदान प्रक्रिया होईल चार जूनला मतमोजणी होऊन लोकसभा निवडणुकीचा निकाल लागेल. देशाच्या इतिहासात थोडं डोकावलं तर लोकसभेची पहिली निवडणूक वैशिष्ट्यपूर्ण होती. या निवडणुकीची प्रक्रिया 25 ऑक्टोबर 1951ला सुरू झाली आणि 21 फेब्रुवारी 1952ला संपली. ही निवडणूक सुमारे चार महिने चालली. हा देशातला सर्वांत मोठा मतदान कालावधी ठरला. पीटीआयच्या माहितीनुसार, देशातली पहिली सार्वत्रिक निवडणूक 25 राज्यांतल्या 401 मतदारसंघांतल्या 489 जागांसाठी 68 टप्प्यांत पार पडली. यंदाच्या (2024) लोकसभा निवडणुकीत 19 एप्रिलला पहिला टप्पा पार पडेल आणि त्यानंतर 47 दिवसांनी मतमोजणी झाल्यावर ही प्रक्रिया पूर्ण होईल. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी लागणारा कालावधी हा 1951-52 च्या संसदीय निवडणुकांनंतरचा दुसरा सर्वांत मोठा मतदान कालावधी असेल.
Politcal History : पहिल्या निवडणुकीत दुधवाल्याकडून हरले होते डॉ. आंबेडकर; कुठली फिरली बाजी?
देशातल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीसाठी ऑक्टोबर 1951मध्ये सर्वप्रथम हिमाचल प्रदेशात मतदान झालं. फेब्रुवारी, मार्चमध्ये हिमाचल प्रदेशातलं हवामान सामान्यपणे खराब असतं. त्यामुळे तिथे प्रथम मतदान झालं. हिमाचल वगळता इतर राज्यांत 1952मध्ये मतदान झालं. पहिल्या लोकसभा निवडणुकीसाठी पहिलं मतदान हिमाचल प्रदेशातल्या चिनी गावातल्या शाळेतले शिक्षक श्यामशरण नेगी यांनी केलं. हा भाग आता कल्पा (जि. किन्नोर) म्हणून ओळखला जातो. त्या वेळी बॅलट पेपरवर मतदान झालं होतं.
1951-52 मध्ये झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाकरिता किमान वयाची अट 21 वर्षं होती. संविधान (61 वी दुरुस्ती) कायदा, 1988 अन्वये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचं वय आता 21 वर्षांवरून 18 वर्षं करण्यात आलं आहे.
पहिल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आयएनसी) हा पक्ष विजयी झाला. या पक्षाला 45 टक्के मतं मिळाली होती. या पक्षाने 489पैकी 364 जागांवर विजय मिळवला होता. या निवडणुकीत दुसऱ्या स्थानावर सोशालिस्ट पार्टी होती. या निवडणुकीनंतर पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान बनले. पहिल्या लोकसभा निवडणुकीवेळी देशातले सुमारे 85 टक्के नागरिक निरक्षर होते. केवळ 15 टक्के नागरिक साक्षर असल्याने सुकुमार सेन यांच्या नेतृत्वाखालच्या निवडणूक आयोगानं राजकीय पक्षांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडणूक चिन्ह मतपत्रिकेवर छापण्याचा निर्णय घेतला होता.
स्वातंत्र्यानंतर दुसरी लोकसभा निवडणूक 24 फेब्रुवारी ते 14 मार्च 1957 दरम्यान झाली.1962मधल्या लोकसभा निवडणुकीचं मतदान सात दिवस तर 1962 ते 1989 दरम्यान झालेल्या लोकसभा निवडणुकांचा मतदान कालावधी चार ते दहा दिवसांचा राहिला. देशात 1980मध्ये सर्वांत कमी म्हणजेच चार दिवसांच्या कालावधीत लोकसभा निवडणूक पार पडली होती. 2004मध्ये या निवडणुकीची प्रक्रिया 21 दिवस, 2009मध्ये एक महिन्यात पाच टप्प्यांत तर 2014मध्ये 36 दिवस आणि 9 टप्प्यांत लोकसभा निवडणूक घेतली गेली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.
आजच्या ताज्या बातम्या, सर्व लाइव्ह न्यूज अपडेट्स, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 मराठीवर.