पोस्टल मतदानाचा अधिकार कोणाला, कसं करायचं मतदान?

मुंबई : भारतीय निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांना मतदान करता यावं यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जातात; मात्र देशातले अनेक नागरिक असे असतात, की ज्यांना निवडणुकीत मतदान करणं शक्य होत नाही. आपल्या घरापासून किंवा गावापासून दूर असलेल्या नागरिकांना मतदान करता यावं यासाठी पोस्टल बॅलट अर्थात टपाली मतदानाची सुविधा सुरू करण्यात आली. त्याबद्दल अधिक जाणून घेऊ या.

ज्यांना निवडणुकीत मतदान करणं शक्य नसतं, अशा व्यक्तींच्या यादीत पहिला समावेश होतो तो जवानांचा. कारण ते सीमेवर तैनात असतात. त्यांच्यासाठीच पोस्टल बॅलटची सुरुवात झाली. त्यांनाच या सुविधेचा सर्वाधिक उपयोग होतो. निवडणुकीची ड्युटी करणारे सरकारी कर्मचारी आणि पोलीस, तसंच अन्य सुरक्षा कर्मचारीदेखील आपल्या मतदारसंघात जाऊन मतदान करू शकत नाहीत. भारतासारख्या देशात त्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्यासाठी पोस्टल बॅलटची सुविधा असते. आपल्या शहराच्या किंवा देशाच्या बाहेर नियुक्त असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठीही ही सोय असते.

कोणाला आणि किती जणांना पोस्टल बॅलटची सुविधा द्यायची आहे, हे निवडणूक आयोग आधीच निश्चित करून घेतो. त्यानंतर त्यांना कागदावर छापलेली खास मतपत्रिका पाठवली जाते. त्यालाच पोस्टल बॅलट म्हणतात. ही प्रक्रिया इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट सिस्टीमद्वारे होते. ही मतपत्रिका प्राप्त करणारा नागरिक आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मत देऊन ती मतपत्रिका इलेक्ट्रॉनिक किंवा पोस्टाद्वारे निवडणूक आयोगाला पाठवतो.

लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951च्या कलम 62(5)नुसार पोलिसांच्या अटकेत असलेल्या आणि दोषी ठरवल्या गेल्यानंतर तुरुंगवास भोगत असलेल्या व्यक्ती मतदान करू शकत नाहीत. प्रिव्हेंटिव्ह डिडेंशनमध्ये असलेल्या व्यक्तीला पोस्टल बॅलटचा अधिकार मिळतो; मात्र कैद्यांना मतदानाचा अधिकार नसतो.

काही जणांना नोंदणी गरजेची
काही जणांना नोंदणी केल्यास पोस्टल बॅलटची सुविधा मिळू शकते. केंद्रापर्यंत जाणं शक्य नसलेल्या दिव्यांग व्यक्ती, तसंच 80 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी नोंदणी केल्यास पोस्टल बॅलटची सुविधा त्यांना मिळू शकते.

मतमोजणीच्या वेळी सर्वांत आधी पोस्टल बॅलट्सची मोजणी केली जाते. त्यानंतर ईव्हीएममधल्या मतांची मोजणी केली जाते. पोस्टल बॅलट्सची संख्या कमी असते आणि त्या कागदी मतपत्रिका असतात. त्यामुळे त्यांची मोजणी सोपी होते.

निवडणुकीच्या निकालात स्पर्धा चुरशीची असेल आणि कमी फरकाने विजय झाला असेल, तर पुढच्या निवडणुकीवेळी पोस्टल बॅलट महत्त्वाचे ठरतात. 2018 साली मध्य प्रदेशात जवळपास 10 जागांवरच्या निकालावर या पोस्टल बॅलट्सचा परिणाम झाला होता. त्यात खासकरून राज्य सरकारच्या निवडणुकीवेळी बहुतांश सरकारी कर्मचाऱ्यांच्या मतांचा समावेश असतो. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांशी निगडित निर्णय किंवा घोषणा त्यावर प्रभाव टाकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.
आजच्या ताज्या बातम्या, सर्व लाइव्ह न्यूज अपडेट्स, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 मराठीवर.

Source link

news portal development company in india

Read More Articles