चंदीगढ : आपला वाढदिवस हा प्रत्येकासाठी वर्षभरातील सर्वात खास दिवस असतो. यादिवशी नातेवाईक, कुटुंबीय, मित्र-मैत्रिणी सगळे शुभेच्छांचा वर्षाव करतात. यासोबतच केक कापून वाढदिवस साजराही केला जातो. त्यामुळे हा दिवस प्रत्येकासाठीच खास असतो. मात्र, एका मुलीसोबत वाढदिवसादिवशीच भयानक घडलं. हा केकच तिच्यासाठी मृत्यू बनून आला. पंजाबमधील पटियाला येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
यात एका घरात वाढदिवस साजरा केल्यानंतर मुलीचा केक खाल्ल्यानंतर मृत्यू झाल्याने आनंदाचं शोकमध्ये रुपांतर झालं. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टमसाठी पाठवला. या प्रकरणी पोलिसांचं म्हणणं आहे की, हा केक कुठून आला याचा तपास सुरू आहे. मानवी नावाच्या मुलीचा वाढदिवस होता, जी 10 वर्षांची होती.
वाढदिवसानिमित्त कुटुंबीयांनी ऑनलाइन केकची ऑर्डर दिली होती. हा केक मुलीसह कुटुंबीयांनी कापून खाल्ला होता. यानंतर पहाटे तीन-चारच्या सुमारास मुलीला उलट्या होऊ लागल्या. हे पाहून कुटुंबीय घाबरले आणि त्यांनी मुलीला जवळच्या रुग्णालयात नेलं. मात्र, रुग्णालयात डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केलं. कुटुंबीयांचं म्हणणं आहे की, केक ऑनलाइन ऑर्डर केला होता, याच केकमुळे मुलीचा मृत्यू झाला. आज तकने याबाबतचं वृत्त दिलं आहे
कुटुंबीयांच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. आरोग्य विभागाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप होत आहे. यामुळे कुटुंबीय आरोग्य विभागावर प्रचंड संतापले आहेत. आमच्या घरी मागवलेल्या केकचीही चौकशी व्हायला हवी, असं कुटुंबीयांचं म्हणणं आहे. दुसरीकडे, ज्या दुकानदाराने ऑर्डर घेतली होती त्या दुकानदाराने त्याच्या दुकानातून केक गेला नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं आहे. दरम्यान, पोलीस अधिकारी सुरिंदर सिंग यांनी सांगितलं की, हा केक कुठून आला याचा आम्ही तपास करत आहोत. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.
आजच्या ताज्या बातम्या, सर्व लाइव्ह न्यूज अपडेट्स, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 मराठीवर.