दिल्ली : दिल्लीत इंडिया आघाडीकडून रामलिला मैदानात रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीला काँग्रेससह इंडिया आघाडीतील पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हेसुद्धा या रॅलीसाठी दिल्लीत पोहोचले आहेत. रॅलीआधी त्यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपवर जोरदार टीका केली. भाजपला भ्रष्ट जनता पार्टी असंही ते म्हणाले. भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले त्यांनाच आता सोबत घेतलं असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीत जागावाटपासंदर्भात बोलताना म्हटलं की, महाविकास आघाडीत जागांवरून पेच नाहीय. आमची भाजपसोबत युती असायची तेव्हाही शेवटच्या क्षणापर्यंत जागावाटपात खेचाखेच व्हायची. पण एकदा शिक्कामोर्तब झाल्यानंतर सगळे एकत्र काम करायचे. मविआत सुद्धा बोलणी दोन तीन महिने झाल्यानंतर त्यांनीही ते समजून घेतल्यासारखं आहे. आम्ही जिंकायच्या इराद्याने लढतो आहे.
देवेंद्र फडणवीसांचा येण्या-जाण्याचा खर्च करतो
राहुल गांधींनी सावरकरांवर असलेला चित्रपट पहावा. जर त्यांना बघायचा असेल तर मी माझ्या खर्चाने पूर्ण हॉल बूक करतो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. याबाबत विचारले असता उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, मी फडणवीसांचा जाण्या-येण्याचा खर्च करतो, खाण्याचा खर्च करतो. त्यांनी मणिपूरला जावं, लडाखला जावं, अरुणाचलला जावं, कश्मिरी पंडितांना भेटावं. बॉयकॉट बॉलिवूडवाले बॉलिवूडच्या नादाला लागले आहेत. त्यांनी आता मणिपूर फाइल्स चित्रपट काढावा.
माझा परिवार असं फक्त बोलून काही होत नाही
इंडिया आघाडीच्या रामलिला मैदानातील रॅलीवर भाजपने पत्रकार परिषद घेत ठगों का मेला असल्याचं म्हणत परिवारवाद बचाव रॅली घेतली जात आहे अशी टीका केली. उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या या टीकेला उत्तर देताना म्हटलं की, परिवारचा अर्थच समजला नाही. माझा परिवार म्हणून काही होत नाही. जबाबदारी तर घ्या. मी मुख्यमंत्री असताना कोरोना काळात माझा परिवार माझी जबाबदारी असं म्हटलं होतं. आता तुम्ही फक्त माझा परिवार माझा परिवार म्हणताय. तुमच्या परिवारात खुर्ची आणि तुम्ही आहात. त्यांचा बुरखा फाटला. निवडणूक रोख्यांचा मुद्दा पुढे येताच देशात सर्वात भ्रष्ट जनता पार्टीचा खरा चेहरा समोर आलाय.
भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच सोबत घेतले
भाजप भ्रष्ट जनता पार्टी, भ्रष्ट नेत्यांना सोबत घेतायत. प्रफुल्ल पटेल यांच्यावर आरोप केले, अजित पवार यांच्यावर आरोप केले, अशोक चव्हाण यांच्यावर आरोप केले, नविन जिंदाल यांच्यावर आरोप केले. या सर्वांवर भाजपने आरोप केले आणि त्यांनाच भाजपने पक्षात घेतले. भ्रष्टाचार, घराणेशाहीचा आरोप ज्यांच्यावर झाला तेच आता त्यांच्यासोबत आहेत असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
भाजपकडे नेते कार्यकर्ते राहिले नाहीत
भाजपकडून अनेक ठिकाणी बॉलिवूड कलाकारांना उमेदवारी देण्यात आलीय. यामध्ये कंगना राणौत, अरुण गोविल यांच्यासह अनेक कलाकार लोकसभेच्या मैदानात उतरणार आहेत. दरम्यान, यावरूनही उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीकास्र सोडले. ते म्हणाले की,भाजपकडे नेते राहिले नाहीत, कार्यकर्ते राहिले नाहीत. बॉयकॉट बॉलिवूड म्हणणाऱ्यांनाच बॉलिवूडचा आधार घ्यावा लागत आहे. अटलजींच्या काळात एक विचारधारा होती. पण ती विचारधारा राहिली नाही. भाजपने ज्यांना भ्रष्ट म्हटलं तेच सर्व लोक आता त्यांच्यासोबत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.
आजच्या ताज्या बातम्या, सर्व लाइव्ह न्यूज अपडेट्स, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 मराठीवर.