जौनपूर : ढाब्यावर दारु पिण्यापासून रोखल्यानं थेट गोळीबार करत मालकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ढाब्याच्या मालकाचा जागीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी दोघांवर हत्या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. उत्तर प्रदेशातील जौनपूर इथं ही घटना घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, गौराबादशाहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जौनपूर आझमगड महामार्गावर लकी ढाब्यात गोळीबाराची घटना घडली. मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास गोळीबारामुळे खळबळ उडाली. या गोळीबारात ढाबा चालवणाऱ्या २४ वर्षांच्या शहजादचा मृत्यू झाला.
गोळीबाराच्या घटनेनंतर घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला. पोलीस म्हणाले की, ३ ते ४ जण बुलेटवरून आले होते. लकी ढाब्यावर बसून ते दारू पीत होते. शहजादने त्यांना ढाब्यावर दारू पिण्यापासून थांबवलं. त्यावेळी सगळे उठून गेले. पण काही वेळाने ते परत आले आणि शहजादवर गोळीबार केला.
अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी गोळी मारणाऱ्या गुन्हेगारांपैकी एकाची ओळख पटवली आहे. त्यांना लवकरात लवकर अटक केली जाईल. दरम्यान, गोळीबाराच्या घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. हल्लेखोरांच्या शोधासाठी चार पथके रवाना केली आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.
आजच्या ताज्या बातम्या, सर्व लाइव्ह न्यूज अपडेट्स, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 मराठीवर.