लखनऊ : हत्येच्या अनेक घटना दररोज समोर येतात. या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आता अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यात एका व्यक्तीने स्वतःच पत्नीसह आपल्या दोन मुलांची हत्या केली. मात्र, हत्येनंतर तो पळून गेला नाही, तर या मृतदेहांसोबत घरातच राहिला आणि त्यांच्याशेजारीच झोपला. थरकाप उडवणारी ही घटना उत्तर प्रदेशच्या लखनऊमधून समोर आली आहे.
लखनऊ पोलीस आयुक्तालयाच्या बिजनौर पोलीस स्टेशन परिसरात एका युवकाने पत्नी आणि दोन अल्पवयीन मुलांची गळा दाबून हत्या केली आणि मृतदेह दोन दिवस घरात ठेवले. एका पोलीस अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती दिली. घरातून दुर्गंधी आल्याने घटनेची माहिती मिळाली. लखनऊ दक्षिणचे पोलीस उपायुक्त (डीसीपी) तेज स्वरूप सिंह यांनी रविवारी पत्रकारांना सांगितलं की, या प्रकरणातील आरोपी राम लखन गौतम हा मूळचा बलरामपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो बिजनौर पोलीस स्टेशन परिसरात भाड्याच्या घरात राहत होता.
डीसीपी म्हणाले की, रविवारी दुपारी घरमालक धीरेंद्र कुमार यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. सिंह म्हणाले की, पोलिसांनी आरोपी राम लखन गौतमला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती (वय 30), तिची मुलगी पायल (वय 6) आणि मुलगा आनंद (वय 3) अशी मृतांची नावं आहेत. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. या हत्येमागील हेतू अद्याप पोलिसांना उलगडता आलेला नाही. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, जेव्हा पोलिसांनी घरमालकाकडून मिळालेल्या मोबाइल नंबरच्या आधारे लोकेशन शोधलं तेव्हा ते लोकेशन सोहरामाऊचं असल्याचं समजलं. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने आरोपीला तिथून अटक केली. चौकशीत आरोपीने सांगितलं, की 28 तारखेला ही हत्या केली . पत्नीचे कोणाशी तरी अवैध संबंध होते. ती अनेक महिने त्याच्यासोबत राहूनच घरी परत आली होती. यामुळे त्याने आधी पत्नीचा स्कार्फने गळा आवळून खून केला आणि नंतर दोन मुलांचाही झोपेत असताना हाताने गळा आवळून खून केला.
हत्येनंतर त्यानी तीनही मृतदेह एका गोणीत भरले. त्यानंतर दोन दिवस तो रात्री पोत्यात मृतदेह टाकून त्यांच्यासोबतच झोपला होता. पोलिसांच्या चौकशीत, त्याने सांगितलं की, त्याला समाधान मिळायचं की त्याचं कुटुंब त्याच्यासोबत झोपलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.
आजच्या ताज्या बातम्या, सर्व लाइव्ह न्यूज अपडेट्स, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 मराठीवर.