कोलकाता : पालघर जिल्ह्यात दोन आठवड्यापूर्वी एका २२ वर्षीय तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. यामुळे पालघरसह महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. तरुणीच्या हत्येचा आरोप तिचा लिव्ह इन पार्टनर रवींद्र रेड्डी याच्यावर होता. पोलिसांनी त्याचा शोध घेतला पण तो फरार होता. शेवटी त्याला पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगना इथून त्याला अटक केली आहे. अटकेनंतर तपासात धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. रवींद्र रेड्डीचं खरं नाव मिनाजुद्दीन अब्दुल अजीज मुल्ला असं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लिव्ह इन पार्टनर असलेली तरुणी त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती. मात्र त्याला लग्न करायचं नव्हतं. शेवटी मिनाजुद्दीनने तिची हत्या करून फरार झाला. लपून बसण्यासाठी तो बंगालला पळून गेला होता. पोलिसांनी सांगितले की, पालघरच्या डहाणू शहरात भाड्याच्या घरात तरुणीचा छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. परिसरातील लोकांनी तरुणीसोबत रवींद्र रेड्डी नावाचा तरुण राहत होता अशी माहिती दिली होती. पोलिसांनी रवींद्र रेड्डीचा तपास केला तेव्हा त्याचं नाव मिनाजुद्दीन मुल्ला असल्याचं समोर आलं. तो रवींद्र रेड्डी बनून महिलेसोबत राहत होता.
जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितलं की, महिला अनीशा बरस्ता खातून १५ मार्च रोजी डहाणूतील एका चाळीत मृतावस्थेत आढळली होती. ती तिच्या लिव्ह इन पार्टनरसोबत राहत होती. दोघांनी आपण पती पत्नी असल्याचंही सांगितलं होतं. तसंच पोलिसांना हिंदू नावे सांगितली होती. पोलिसांनी तपास सुरू केला असता याचे धागेदोरे पश्चिम बंगालपर्यंत पोहोचले. तिथे मिनाजुद्दीन मुल्लाला ताब्यात घेण्यात आलं. त्याने डहाणूत खोली भाड्याने घेण्यासाठी आपलं नाव रवींद्र रेड्डी असं सांगितलं आणि २२ वर्षीय तरुणी आपली पत्नी असल्याचं सांगितलं.
आरोपीची माहिती मिळताच डहाणू पोलिसांनी पश्चिम बंगालमध्ये त्याला पकडण्यासाठी टीम पाठवली होती. ७ दिवस शोध घेतल्यानंतर २२ मार्चला त्याला पकडण्यात आलं. पीडितेची हत्या लग्नासाठी दबाव टाकत असल्यानं केल्याचं त्याने सांगितलं. अटकेनंतर मिनाजुद्दीन मुल्लाला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला २ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. आता पोलीस या प्रकरणात इतर कोणाचा सहभाग आहे का याचा तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.
आजच्या ताज्या बातम्या, सर्व लाइव्ह न्यूज अपडेट्स, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 मराठीवर.