सौरभ तिवारी, प्रतिनिधी
बिलासपुर : अनेकांना दारूचे व्यसन लागलेले दिसून येते. कुणी आवड म्हणून दारू पितो, कुणी फॅशन म्हणून दारू पितो, कुणी टेन्शन कमी व्हावं म्हणून पितो. सध्या तर अनेक तरुणींमध्येही दारूचे व्यसन दिसून येते. त्यातच आता मद्यपींना दणका देणारी एक बातमी समोर आली आहे. दारूच्या किंमतींमध्ये तब्बल 30 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
छत्तीसगडमध्ये 1 एप्रिलपासून नवीन उत्पादन शुल्क धोरण लागू झाले. त्यात अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. दारुच्या किंमतींमध्ये 10 रुपयांपासून ते 200 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. यामध्ये दर्जानुसार दारूच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी दिनकर वासनिक यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, दारुच्या दरात 30 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार आता देशी व इंग्रजी दारू आणि बाटल्यांच्या दरात 10 ते 200 रुपयांची वाढ झाली आहे.
होळीला दारूची मोठ्या प्रमाणात विक्री –
उत्पादन शुल्क विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दरवर्षीपेक्षा यंदा होळीच्या काळात बिलासपूरमध्ये जास्त मद्यविक्री झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी बिलासपूर उत्पादन शुल्क विभागाला 50 लाख रुपयांचा अधिक नफा झाला आहे. होळीमध्ये सुमारे 10 कोटी रुपयांची दारू विकली गेली.
छत्तीसगड सरकारने मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील दोन कंपन्यांचाही निविदेत समावेश केला आहे. यापूर्वी केवळ तीन डिस्टिलरीजमधून पुरवठा केला जात होता. आता सात नवीन पुरवठादारांशी करार करण्यात आले आहेत. त्यामुळे देशी दारूच्या दुकानांमध्ये तीनऐवजी सात ते दहा प्रकारचे नवीन ब्रँड उपलब्ध होणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
दारूच्या दुकानांची वेळ –
नवीन नियमांमुळे दारूच्या दुकानांच्या वेळांमध्येही बदल करण्यात आला आहे. आता राज्यात दारुची दुकाने सकाळी 10 वाजेपासून रात्री 10 पर्यंत सुरू राहतील. याआधी दुकाने 9 वाजता सुरू व्हायची. राज्यात 35 टक्क्यांपेक्षा जास्त लोक दारू पितात. त्यामुळे नवीन आर्थिक वर्षासाठी 11 हजार कोटींचे महसूलाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.
आजच्या ताज्या बातम्या, सर्व लाइव्ह न्यूज अपडेट्स, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 मराठीवर.