सूरत : ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. अनेकदा लोक कुठेतरी जाहिराती पाहून उपचारासाठी किंवा खरेदीसाठी अशा लोकांवर विश्वास ठेवतात, जे नंतर त्यांची फसवणूक करतात. हे सायबर गुन्हेगार पैसे उकळण्यासाठी सतत नवनवीन पद्धती आणि मार्ग शोधत असतात. अनेकदा लोकांना अशा प्रकरणांमध्ये खबरदारी घेण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, तरीही लोक या सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतात. आता असंच आणखी एक प्रकरण समोर आलं आहे, मात्र हे प्रकरण काहीसं वेगळं आहे.
हे प्रकरण गुजरातच्या सूरतमधून समोर आलं आहे. यात उज्जैन येथील एका तांत्रिकाने एका सर्व्हिस एक्झिक्यूटिव्हची लाखोंची फसवणूक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रकरण सुरतच्या भाटपोर गावचं आहे. येथे 34 वर्षीय राजेश नारन परमार टोयोटा कंपनीत सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतात. ते काही काळापासून नैराश्याने त्रस्त होते. तणावामुळे त्यांना अनेकदा डोकेदुखीचा त्रास होतो. यामुळे 2022 मध्ये त्यांची आधीची नोकरीही गेली. मात्र, नवीन नोकरी मिळाल्यानंतर त्याला भयानक स्वप्नं पडू लागली. त्याला त्यातून सुटका हवी होती. त्यामुळे त्यानी अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतला. पण काही फरक पडला नाही.
एके दिवशी त्याला फेसबुकवर एका तांत्रिकाचा आयडी दिसला. त्यामध्ये मी तांत्रिक शक्तींनी प्रत्येक समस्या सोडवू शकतो असं लिहिलं होतं. राजेशने तांत्रिकाशी संपर्क साधला असता त्याने आपलं नाव मनीषकुमार विश्वनाथ असल्याचं सांगितलं. त्याला तांत्रिक ज्ञान माहीत असल्याचं त्याने सांगितलं. राजेशने त्याला त्याची अडचण सांगितल्यावर मनीषने सांगितलं की, त्याच्या घरात आत्मा राहात आहेत. यासाठी विशेष पूजा आणि 3 बकऱ्यांचा बळी द्यावा लागणार आहे. ज्याची किंमत 1 लाख 26 हजार रुपये असेल.
तांत्रिकाच्या बोलण्याने राजेश प्रभावित झाला आणि त्याने पैसे त्याच्याकडे ट्रान्सफर केले. तरीही समस्या सुटत नसल्याने राजेशने पुन्हा तांत्रिक मनीषशी संपर्क साधला आणि म्हणाला की माझी डोकेदुखी अजूनही दूर झाली नाही आणि मला वाईट स्वप्नं पडणं थांबलं नाही. मनीष म्हणाला, की मी बाकीच्या आत्म्यांना बाहेर काढलं आहे, पण तीन जिद्दी आत्मे बाहेर येत नाहीत. त्यासाठी 108 बकऱ्यांचा बळी द्यावा लागतो. पुन्हा एकदा राजेशवर त्याच्या बोलण्याचा प्रभाव पडला. त्याने त्याच्या बहिणीच्या आणि कुटुंबातील इतर सदस्यांच्या खात्यातून मनीषच्या खात्यात अधिक पैसे पाठवले.
मनीष काही दिवसांनी पुन्हा म्हणाला, तुझं काम झालं. आत्मे निघून गेले. पण तरीही राजेशचा त्रास संपला नव्हता. त्यानी पुन्हा तांत्रिकाला फोन केला असता दुसऱ्याच व्यक्तीने त्याचा फोन उचलला. मनीषचा अपघात झाल्याचं सांगितलं. यानंतर फोन बंद येऊ लागला. तेव्हाच आपली फसवणूक झाल्याचं राजेशच्या लक्षात आलं. त्यांनी तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी सध्या गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.
आजच्या ताज्या बातम्या, सर्व लाइव्ह न्यूज अपडेट्स, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 मराठीवर.