नवी दिल्ली : कचोरीचा आस्वाद घेत असताना अचानक ग्राहकांची गर्दी असलेल्या दुकानात मर्सिडिज घुसली. कारने थेट पाच जणांना चिरडलं, नेमकं काय घडलं हे कळण्याच्या आतच ही गाडी प्रसिद्ध असलेल्या कचोकीच्या दुकानात घुसली. या भीषण अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
दिल्लीच्या सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशन हद्दीतील एका प्रसिद्ध कचोरी दुकानात भरधाव वेगात असलेली मर्सिडिज कार घुसली. या अपघातात पाच जण जखमी झाले आहेत. सुदैवानं कोणतीही जीवितहानी मोठी झाली नाही, दुकानाचं मोठं नुकसान झालं आहे. कारचा चालक उत्तर प्रदेशचा असून तो नोएडा सेक्टर-79 येथे राहतो.
अपघातानंतर चालकाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं. त्याचा काही चाचण्या केल्या, त्यावेळी तो नशेत नव्हता त्यामुळे अपघातामागचं नेमकं कारण काय याची चौकशी सध्या सुरू आहे. मर्सिडीज कार चालकाचे नाव 36 वर्षीय पराग मैनी असल्याची माहिती मिळाली आहे.
Video: A speeding Mercedes SUV rammed into a popular food joint in North #Delhi leaving six people injured. As per preliminary medical examination, the driver was not under the influence of alcohol, however, the police have preserved the blood sample for analysis. pic.twitter.com/SWMqHC6PLW
— Bhaskar Mukherjee (@mukherjibhaskar) April 2, 2024
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना 31 मार्च रोजी घडल्याचं सांगितलं जात आहे. संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून ही अंगावर काटा आणणारी आहे. फतेहचंद कचोरी विक्रेत्याच्या दुकानात कार घुसल्यानं त्यांचं मोठं नुकसान झालं.
अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी तीर्थराम रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात पाच जण जखमी झाल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर पोलिसांनी कार जप्त केली असून चालक पराग मैनी याला अटक करण्यात आली आहे. प्राथमिक वैद्यकीय तपासणीत चालक दारूच्या नशेत नसल्याचे स्पष्ट झाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.
आजच्या ताज्या बातम्या, सर्व लाइव्ह न्यूज अपडेट्स, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 मराठीवर.